Wikipedia

Search results

Friday 8 March 2013

महात्मा - फुल

आधुनिक भारताचे पहिले समाजक्रांतिकारक !
१९ व्या शतकाचा शेवटचा कालखंड; धर्मसुधारणा, सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींचा काळ ! या काळात काहीशा वेगाने सामाजिक बदलांची प्रक्रिया घडत होती. या चळवळींचे नेतृत्व सखोल चिंतन करणार्‍या, समाजहित जपणार्‍या व धडक कृतीशील असणार्‍या महात्मा फुले यांच्याकडे होते.  शिक्षण व समता या दोन शब्दांत त्यांच्या आयुष्यातील विविध टप्प्यांमध्ये केलेल्या सामाजिक कार्याची मूळ प्रेरणा स्पष्ट होते.
महात्मा ज्योतीबा फुले यांचा जन्म १८२७ साली झाला. त्या वेळी संपूर्ण भारतात बहुजन समाज अंध:कारात चाचपडत होता. अज्ञान, अंधश्रद्धा व अस्पृश्यता यांचे भयंकर चटके सोसत होता. स्त्री आणि (तत्कालीन) अस्पृश्य समाज हे या समाजव्यवस्थेतील सर्वाधिक उपेक्षित घटक होते. त्यामुळेच स्त्रीशिक्षण व अस्पृश्योद्धार हे त्यांचे जणू जीवितकार्यच झाले. त्या वेळच्या स्त्रिया ह्या शिक्षण नसल्यामुळे स्वत:ची मूळ अस्मिताच हरवून बसल्या होत्या. या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता होती. मुळात समाजोद्धारासाठी शिक्षण हेच प्रमुख अस्त्र आहे हे ज्योतिरावांनी ओळखले. एक स्त्री सुशिक्षित म्हणजे पुढच्या सर्व पिढ्या सुशिक्षित हे समीकरण त्यांनी जाणले व या पवित्र कार्याची सुरुवात आपल्या पत्नीला शिक्षण देऊन त्यांनी केली. १८४८ साली हिंदुस्थानातील पहिली मुलींची शाळा पुणे येथे त्यांनी सुरू केली. त्यांनी व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, लोकविरोधाला उत्तर देत १८५१ ,१८५२ साली व पुढील काळात अनेक कन्या शाळा सुरू केल्या.
स्त्रियांना सबला बनविण्यासाठी, स्त्रीउद्धारासाठी त्यांनी बालविवाह, कुमारीविवाह, विधवांचे केशवपन या परंपरांना प्रचंड विरोध केला. या परंपरांच्या विरोधात जाऊन त्यांनी १८६४ साली पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला. ही एक क्रांतिकारक अशी घटना होती. त्याचबरोबर त्यांनी केशवपनाच्या विरोधी आंदोलन करून नाभिकांचा अभिनव असा संप घडवून आणला. पण तरीही पुनर्विवाह समाजाला पचणे अवघड होते. एखाद्या विधवेला दुर्दैवी परिस्थितीत संतती झाल्यास त्या विधवेस भ्रूणहत्या किंवा आत्महत्येशिवाय पर्याय राहत नसे. ही समस्या ओळखून त्यांनी १८६३ साली पुण्यात पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह उघडले. त्यांनी याच प्रतिबंधक गृहातील एक मुलगा दत्तक घेतला. यावरूनच त्यांचे स्त्रीविषयक विचार किती आधुनिक व पुरोगामी होते हे स्पष्ट होते. आजच्या समाजाचे स्त्रीविषयक विचार, दृष्टीकोन पाहता त्यांचे द्रष्टेपण लक्षात येते.
स्त्री उद्धाराबरोबरच अस्पृश्योद्धार व अस्पृश्यता निर्मूलन हा त्यांचा ध्यास होता. त्या वेळीचा अस्पृश्य समाज हा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक हक्कांपासून वंचित होता. त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या प्राथमिक मानवी हक्कांच्या प्राप्तीसाठी ते सामाजिक समता चळवळीचे आद्य प्रवर्तक बनले. १८५२ साली त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा काढली. अस्पृश्यांसाठी त्यांनी पाण्याचा हौद खुला केला. गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब या ग्रंथांतून त्यांनी जातिव्यवस्थेवर प्रहार केला. अस्पृश्य समाजामध्ये आमिविश्र्वास निर्माण होण्यासाठी, समस्यांची जाणीव निर्माण होऊन विकासाकडे वाटचाल होण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची इ.स. १८७३ मध्ये पुणे येथे स्थापना केली. या संस्थेच्या स्थापनेतून त्यांनी बहुजन समाजाच्या विकासाचे बीज रोवले.
पिढीजात चालत आलेल्या अमानवी अशा धार्मिक रूढी व परंपरा बंद झाल्याशिवाय समाजामध्ये परिवर्तन होणार नाही हे त्यांनी ओळखले होते. सामाजिक सुधारणांसाठी व्यापक योगदान देऊन, आपल्या मानवतावादी भूमिकेतून वंचित आणि उपेक्षित घटकांना मुख्य समाजप्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महात्मा फुले यांनी केले. आजच्या आधुनिक भारतातील समाजात झालेल्या सामाजिक सुधारणांचे मूळ हे महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्यातच आहे.

`निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’

हा त्यांचा सत्यधर्माचा व मानवताधर्माचा संदेश आजही अनुकरणीय ठरतो.

No comments:

Post a Comment