Wikipedia

Search results

Saturday 2 March 2013

आबालाल रहिमान

आबालाल रहिमान यांचा जन्म १८६० मध्ये कोल्हापूर येथे झाला. मुंबईला जाऊन जे. जे. स्कूल मध्ये शिकणारे ते जसे कोल्हापूरमधील पहिलेच कलावंत होते, तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या कारकीर्दीत राजाश्रय प्राप्त करणारेदेखील ते पहिले कलावंत होते. १८८० मध्ये त्यांनी जे. जे. स्कूल मध्ये प्रवेश मिळवला. १८८८ मध्ये त्यांच्या एका चित्राला व्हाईसरॉयचे सुवर्णपदक प्राप्त झाले होते. तेव्हापासून जे. जे. मध्ये सुवर्णपदक देण्याची पद्धत सुरू झाली. रावबहादुर धुरंधर, माधवराव बागल हे चित्रकारदेखील त्यांना आपले गुरू मानत. आबालाल यांची ‘रावणेश्र्वर’ आणि ‘संध्यामठ’ ही दोन चित्रे खूप गाजली. या दोन चित्रांवरून त्यांचे कौशल्य दिसून येते. राजर्षी शाहू महाराजांचे निधन झाल्यावर आपल्या कलेचा चाहता, रसिक या जगात राहिला नाही म्हणून त्यांनी आपली चित्रे पंचगंगेच्या पात्रात सोडून दिली. आबालाल मास्तर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशा या असामान्य व संवेदनशील चित्रकाराचे १९३१ मध्ये निधन झाले.दिल्लीतील एका कलादालनासह कोल्हापुरातील न्यू पॅलेस व टाऊन हॉल येथील कलादालनांत त्यांची चित्रे जतन करून ठेवण्यात आली आहेत.
आबालालांचा जन्म १८६० साली कोल्हापुरात झाला. त्यांच्या घराण्यात कुराणाच्या हस्तलिखित व सुलेखन, चितारकामाने सजवलेल्या प्रती बनवण्याचे काम पिढिजात केले जात होते. त्यांचे वडील फारसीमध्ये पारंगत होते. बालपणी आबालाल कुराणाची हस्तलिखिते रंगविण्यात वडलांना मदत करीत. त्यातूनच त्यांना बालवयात चित्रकलेची गोडी लागली.

आबालाल रहिमान हे सर्वात ज्येष्ठ चित्रकार. त्यांचा कलानिर्मितीचा कालही सर्वात जुना. १८८० मध्ये ते मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी होते. १८८८ पर्यंत ते मुंबईत होते. त्या काळात त्यांनी अहर्निश काम करुन कलासाधना केली व त्या साधनेच्या जोरावरच मरेपर्यंत म्हणजे सन १९३१ पर्यंत अव्याहतपणे कलानिर्मिती केली. १८८० ते १८८८ या काळात त्यांनी आर्ट स्कूल मध्ये केलेली कामे स्कूलच्या जुन्या रेकॉर्डमध्ये पहावयास मिळतात. १८८८ मध्ये त्यांच्या एका चित्रांच्या एका संचासाठी त्यांना व्हॉईसरॉयचे (लॉर्ड डफरीन त्यावेळचे व्हॉईसरॉय) सुवर्णपदक देण्यात आले. गुळगुळीत पावडर शेडिंगच्या काळातही आबालाल यांनी लाईन ड्नॅइंर्गमध्ये स्वतंत्र्यपणे प्रस्थापित केलेली शैली पाहून त्यांच्यातील अभिजात कलागुणाची साक्ष पटते. स्कूल ऑफ आर्टमधील त्या वेळच्या अध्यापक वर्गात आबालाल विषयी किती आदर होता. या विषयी रा. ब. धुरंधरांनी आपल्या पुस्तकात आवर्जून उल्लेख केलेला आहे. कुणा इतर कलावंतांशी तुलना करुन आबालाल यांच्यातील कलागुणाची महती पटवून देण्याचे कारण नाही. त्यांच्या चित्रांच्या सान्निध्यात अपरिमित आनंद प्राप्त करुन देणाऱ्या ज्या दृक् संवेदना होतात. त्यातूनच आबालाल यांच्यातील कलासामर्थ्याची प्रचिती होते.
आबालाल हे एक संवेदनाक्षम व प्रयोगशील चित्रकार होते. त्यांनी पुष्कळ प्रकारच्या तंत्रपध्दती वापरुन चित्रनिर्मिती केली असं त्यांचे शिष्य सांगतात. म्हणूनच त्यांची चित्रे ठराविक ठश्याची वाटत नाहीत. चित्रकला त्यांच्या बाबतीत केवळ व्यवसायाची बाब नव्हती तर ती एक प्रेरणाशक्ती होती. त्यांच्या अंतदृष्टीपुढे अव्याहतपणे असंख्य प्रतिमा एकमागून एक सरकू लागतात. त्यांचे संबंध व्यक्तित्व त्या व्यापून टाकतात. मग ते त्यातील मिळतील तेवढ्या प्रतिमा आपल्या माध्यमामधून अनुभवू पाहतात. अशा अव्याहतपणे चाललेल्या मंथनातून कधी पंधरावीस हजार चित्रे घडली हे त्यांनासुध्दा समजलं नाही.
पहिल्या चित्रापासून ते अखेरच्या चित्रापर्यंत त्यांचा शोध चालूच होता आणि तरीसुध्दा कोल्हापूरसारख्या कलाक्षेत्रातील घडामोडींच्या दृष्ठीने फारशा घटना न घडणाऱ्या अशा एकांतस्थळी सन १९२०-२१च्या सुमारास आबालालना ज्या कलामूल्यांचा शोध लागला होता, तो मुंबईतल्या कलाकारात पूर्णपणे रुजायला १९३५ साल उजाडावे लागले. यावरुन त्यांच्या प्रतिभेची झेप केवढी होती हे ध्यानी येते.

बाबुराव पेंटर
बाबुराव पेंटर यांचा जन्म जून, १८९० मध्ये कोल्हापूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव बाबुराव मेस्त्री असे होते. चित्रकला व शिल्पकला यांचे धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. सुरुवातीला ते तैलचित्रे काढत. गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबूराव पेंटर यांची कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली. १९३० च्या सुमारास त्यांनी तयार केलेली सिनेमाची पोस्टर्स पाहून जे. जे. स्कूलचे तत्कालीन संचालक सालोमन यांनी त्यांचा सत्कार केला. जे. जे. स्कूलमध्ये काहीही शिक्षण घेतलेले नसतानादेखील  रंगांच्या शुद्धतेविषयी व मिश्रणाविषयी बरीच माहिती त्यांना होती. चित्रकलेतील त्यांचे तंत्रकौशल्य म्हणजे रंगछटांचे वजन ते थोडेदेखील ढासळू देत नसत. त्यातूनच ते एक कल्पनारम्य, उत्कृष्ट अशी प्रतिमा निर्माण करत. त्यांनी तयार केलेल्या महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या शिल्पकृती आजही कोल्हापूरमध्ये बघायला मिळतात. कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल ‘कलामहर्षी’ या पदवीने गौरवण्यात आलेल्या बाबूराव पेंटर यांनी १९५४ मध्ये जगाचा निरोप घेतला.
कलामहर्षी बाबुराव पेंटर :
कोल्हापूर हे कलेचे माहेरघर. तेथील कलावंत मंडळी स्वस्थ कशी बसतील? आनंदराव व बाबुराव पेंटर हे दोघे बंधू कोल्हापूरचे अष्टपैलू कलाकार. आनंदरावांच्या मृत्यूनंतर बाबुराव पेंटर यांनी जिद्द व परिश्रमाने स्वत: प्रोजेक्टर व स्वदेशी कॅमेरा तयार केला. त्याचबरोबर प्रिंटिंग मशीन, डेव्हलपिंग स्पिडोमीटरही तयार केला. दि. १ डिसेंबर, १९१८ साली त्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. स्त्रीपात्रे असलेला पहिलाच चित्रपट त्यांनी निर्माण केला, तो म्हणजे ‘सैरंध्री’. पुण्यातील ‘आर्यन’ थिएटरमधे तो ७ फेब्रुवारी, १९२० रोजी दाखविला गेला. यातील भीम व कीचक यांच्या द्वंद्वयुद्धाचे दृश्य पाहून प्रेक्षक बेशुद्ध पडले होते, इतके ते दृश्य-कोणतेही ट्रिक सीन्स नसतांनाही-जिवंत चित्रित झाले होते. यावरूनच ब्रिटिश सरकारने सेन्सॉर पद्धत सुरू केली, जी आजही सुरू आहे. महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या माध्यमातून बाबुराव पेंटर यांनी फ्लॅशबॅक पद्धत प्रथमच वापरून १९२५ साली ‘सावकारी पाश’ हा सामाजिक मूकपट तयार केला. परदेशात चित्रपट प्रदर्शनात पाठविलेला हा भारतातील पहिला चित्रपट ठरला. चित्रपटाचे तंत्र, मंत्र व मर्म जाणणारे बाबुराव पेंटर हे एकमेवाद्वितीय दिग्दर्शक होते. त्यांच्या कंपनीमधून मद्रासचे एच. एम. रेड्डी, नागी रेड्डी, व महाराष्ट्रातील व्ही. शांताराम, दामले, फत्तेलाल, धायबर, बाबुराव पेंढारकर, मा. विनायक, नानासाहेब सरपोतदार यांसारखे कलाकार तयार झाले. मूकपटांतून रुबी मायर्स, मा. विठ्ठल, पृथ्वीराज कपूर, झेबुन्निसा, ललिता पवार असे कलावंत तयार झाले. कल्पकता, कलात्मकता, वास्तववाद आणि सामाजिक प्रबोधन ही गुणवैशिष्ट्ये बाबुरावांसारख्या श्रेष्ठ गुरूने भारतीय चित्रपटसृष्टीला दिली. त्यांनी १९२० ते १९२८ या कालावधीत १७ मूकपट निर्माण केले.

No comments:

Post a Comment