Wikipedia

Search results

Friday 10 January 2014

ज्या रंगाचा चष्मा आपण घालतो त्याच रंगाची दुनिया दिसते

प्रचि
ज्या रंगाचा चष्मा आपण घालतो त्याच रंगाची दुनिया दिसते. जर उदास, नैराश्याच्या चष्मा घातला तर सगळीकडे फक्त उदासी आणि नैराश्यच दिसेल, याउलट जर प्रसन्नतेचा चष्मा असेल तर सगळं जगच सुंदर दिसेल. अशीच एक प्रसन्न भटकंती करून घरी परतताना लोकल ट्रेनच्या खिडकीवरची कळकट्ट जाळी देखील सुंदर भासली.
 प्रचि
आणि मग अशाच जाळीतुन जग आणखीनच सुंदर दिसायला लागले.
 प्रचि
"
आयुष्य कितीही खडतर असलं तरी ते आनंदाने फुलवत रहा" हे या खडकावरल्या अंकुराकडुन आपणांस शिकता येईल.
 प्रचि
"
आयुष्य किती क्षणभंगुर आहे" हे ह्या फोटोला पाहिल्यावर मला नेहमीच जाणवणार. एकदा देवळांच्या भटकंतीला गेलो असता पायर्यांवर मला हि भेटली. तीचे मस्त फोटोसेशन केल्यानंतर जवळ पास अर्धा पाऊण तास देवळाच्या परिसरात भटकलो. परतीच्या वाटेवरती, या कालावधीत गोगलगायीने किती अंतर पार केले हे पाहण्यासाठी तेथे गेलो असता, कुणाच्यातरी पायाखाली येऊन तीचे अस्तित्वच संपले होते. खुप वाईट वाटले, त्यापेक्षा स्वतःचा राग जास्त आला. वाट वर्दळीची आहे हे माहित असुनही मी तिला जवळच्या झाडीत उचलुन ठेवले नाहि. ...........कदाचित एक जीव वाचला असता. अरेरे
प्रचि
"
कट्टा" सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. काहि क्षण मित्रमंडळी एकत्र येणार. गप्पांचे फड रंगणार आणि परत सगळे आपआपल्या मार्गी जाणार. उरणार तो एकटा वृक्ष, या सगळ्या आठवणींना सोबत घेऊन. आपलं आयुष्यहि थोडसं असच असतं ना?, "यथा काष्ठंच काष्ठंच . . . . . " या संस्कृत श्लोकाप्रमाणे.
काहि व्यक्ती आयुष्यात येतात, दोन-चार क्षणांची सोबत करतात आणि निघुन जातात. उरतात त्या फक्त आठवणी आणि आपण, "पारावरच्या त्या वृक्षासारखे" एकटेच.
 प्रचि
रंगपंचमीच्या दिवशी लाल रंग लावल्यामुळे रडकुंडीला आलेली हि चिमुरडी. पण पुढे आयुष्यात राग, लोभ, मद, मत्सर, मोह, यश, अपयश, द्वेष या सार्या रंगात रंगायचेच आहे हे जर तिला माहित असते तर या कृत्रिम रंगाची भिती कदाचित तिला वाटली नसती.
 प्रचि
"..........
वार्ध्यक्य साचले, उरलो बंदी पुन्हा मी". आयुष्यातील सुखदु:खांचा हिशोब मांडताना, हातावर हात ठेवून, हताश होऊन, देवाला स्मरत बसलेले हे आजोबा.
 प्रचि
"
आयुष्य म्हणजे काय रे भाऊ?".आमच्यासाठी सध्यातरी हे चाक आणि हा खेळ हेच आयुष्य आहे आणि तेच आमचे विश्व आहे. पुढंच पुढे बघु. हेच तर चिडवून सांगत नसेल ना हा?
 प्रचि
खांब केळीचे उभे, वरती तोरण शोभे
दारी चौघडा गाजे, सूर सनईचा वाजे
तिच्या आणि त्याच्या आयुष्यातील हळुवार पण तितकाच महत्वाचा एक क्षण.आयुष्यभरासाठी त्याच्या हातात विश्वासाने हात देणारी ती आणि तितक्याच विश्वासाने तिला साथ देणारा तो.
 प्रचि१०
संथ पाण्यात सहजच मारलेला एक दगड आणि त्यामुळे पाण्यावर उठलेले असंख्य तरंग.
आपल्या जीवनातही असंच असतं, येणारे एखादे दु: किंवा संकट हे एकटे येता सोबत अनेक दु:खे/संकट घेऊन येतात ज्यामुळे कित्येकदा आयुष्य ढवळुन निघते. अर्थात हे त्या पाण्यावरच्या तरंगासारखेच कायम रहाता काहिवेळानंतर निवांत होतात.
 प्रचि11
रोज रोज त्याच त्याच आयुष्याचा (सुंदर सुंदर फुलांवर बसण्याचा) कंटाळा आला असेल कदाचित म्हणुन for a change हे फुलपाखरू चक्क मातीत बसले. अर्थात "मातीची" ओढ सगळ्यांनाच असते.
 प्रचि12
"
जो सब करते है यारो, वो क्यों हम करे".सगळे जे करतात ते मी का करू? कधी कधी प्रवाहाच्या विरूद्ध पोहणे हा हि आयुष्याचाच एक भाग आहे ना?
 प्रचि13
कुणाला हा फोटो, निष्पर्ण, उजाड, उदास वाटेल,कुणाला हा फक्त एक झाडाचा फोटो वाटेल, मला हा फोटो काढताना मोराच्या फुललेल्या पिसार्याची आठवण झाली होती. अर्थात आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा प्रत्येकाचा वेगळा असतो.

 

No comments:

Post a Comment