Wikipedia

Search results

Saturday 20 July 2013

गोळाबेरीज

गोळाबेरीज
अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत पुलं तथा पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांची जादू आजही मराठी मनावर कायम आहे . लेखक , कवी , दिग्दर्शक , नाटककार , नट , वादक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या पुलंच्या कलाकृतींचा मोह अनेक नटांना झाला . म्हणूनच त्यांच्या कलाकृतींचे सादरीकरण आजही अनेक ठिकाणी होत असते . अखिल मराठीजनांना हसवणाऱ्या पुलंची गोष्ट आता प्रथमच रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे .

अभिनेता - दिग्दर्शक क्षितीज झारापकरने हे शिवधनुष्य उचलायचे ठरवले आहे . ' गोळाबेरीज ' असे नाव असलेल्या या भव्य सिनेमात मराठी मनोरंजनविश्वातले तब्बल ४२ स्टार्स असणार आहेत .

पुलंची २७ पुस्तकं , त्यांच्यावरचे ३ माहितीपट , त्यांचे पाच सिनेमे आणि काही लेखांचा समावेश या सिनेमात करण्यात आला आहे . याबाबत बोलताना दिग्दर्शक क्षितीज म्हणाला , ' एखाद्या लेखकावर सिनेमा करावा असे मला वाटत होते . त्यासाठी पुलंशिवाय दुसरं नाव नव्हतेच . कारण , ते स्वत : बहुआयामी प्रतिभावंत होतेच . पण , त्यांना भेटलेल्या माणसांचे अचूक वर्णन त्यांच्या लेखनात दिसते . सिनेमा करण्यासाठी ही पात्रे अत्यंत महत्त्वाची होती . हा सिनेमा म्हणजे पुलंचा इतिहास नव्हे , तर त्यांची गोष्ट असेल .'
   पुलंच्या जन्मापासून साठीपर्यंतचा प्रवास या सिनेमात दिसेल . या प्रवासादरम्यान त्यांना भेटलेली माणसे या सिनेमात येतील . हरितात्या , दामले मास्तर , चितळे मास्तर , नंदा प्रधान , सोन्या बागलणकर , अंतू बरवा , बाबा आमटे , नामू परीट , रावसाहेब , सखाराम गटणे , पेस्तन काका , नारायण अशी त्यांच्या पुस्तकांतून भेटलेली सगळी माणसे या सिनेमात पुलंसोबत दिसतील . यासाठी ' खोगीरभरती ', ' गोळाबेरीज ', ' हसवणूक ', ' व्यक्ती आणि वल्ली ', ' गणगोत ', ' बटाट्याची चाळ ', ' असा मी असामी ', ' म्हैस ', ' काही अप्स काही डाऊन्स ' आदी पुस्तके - लेखांसोबत ' गुळाचा गणपती ', ' दूधभात ', ' पुढचं पाऊल ' अशा सिनेमांचे काही अंश यात असतील . त्यांच्या मूळ कलाकृतींना कोणताही धक्का न लावता त्यांना या पटकथेत समाविष्ट केले जाणार आहे . सिनेमाची कथा , पटकथा , संवाद क्षितीजचेच आहेत . ' पुलंचे लिखाण विनोदी होतेच . पण , त्यात आयुष्याचे मोठे तत्त्वज्ञान लपलेले असे . ते अधोरेखित करण्याचा माझा प्रयत्न असेल . या सिनेमाला परवानगी देतानाच , आपल्याकडील पुलंचे अप्रकाशित साहित्य , त्यांची भाषणे , पेटीवादन असा सर्व खजिना देण्याची तयारी पुलंच्या नातेवाईकांनी दर्शवली आहे ,' अशी माहितीही त्याने दिली .

पुलंसाठी सर्वसृष्टी एकत्र ?
' गोळाबेरीज ' चे शूट ऑक्टोबरमध्ये सुरू होणार असून , सध्या कलाकारांना करारबद्ध करण्याचे काम सुरू आहे . एकूण ७७ पैकी ४२ भूमिकांसाठी सिने , नाट्य , टीव्हीसृष्टीतल्या ४२ स्टार्सकडे विचारणा करण्यात आली आहे . या सर्वांनी होकार दिला , तर पुलंसाठी संपूर्ण इंडस्ट्री एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे .

No comments:

Post a Comment