Wikipedia

Search results

Thursday 13 March 2014

नेहरू तारांगण


मुंबईतील वरळी येथील नेहरू तारांगण आपल्याला एका अद्भुत दुनियेत घेऊन जाते. आकाशदर्शनाचा एक रोमांचक अनुभव तिथे घेता येतो. त्यातूनच अनेकांचे कुतूहल जागे होते. त्यातील काहीजण संशोधक किंवा प्राध्यापक होतात , तर काही विज्ञानप्रसाराचा वसा घेतात...
......

वरळीतील नेहरू तारांगण हे मुंबईतील रहिवाशांकरिता आणि पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे. महालक्ष्मी मंदिराकडून हाजीअलीचा दर्गा पार करत पुढे आलात की उजवीकडे नेहरू सेंटरची १६ मजली गोल इमारत डोळ्यात भरते. थोडं जवळ आल्यास गोल इमारतीच्या पुढील छोटेखानी घुमट आपल्याला वेगळ्याच विश्वात नेणार , याची खात्री पटवतो.

सन १९७५मध्ये पी. जी. पटेल यांनी जर्मनीहून कार्ल-झाइस कंपनीचा तारांगणाचा प्रोजेक्टर विकत आणला. तो अडकला सीमा-शुल्क विभागात. तो सोडवून घेतला रजनीभाई पटेल यांनी. त्यावेळी रजनीभाईंचा वरळी येथे नेहरू सेंटर सुरू करण्याचा मानस होता. अखेर नेहरू सेंटर तर्फे शैक्षणिक उपक्रम म्हणून तारांगण सुरू करावे असे ठरले. पण ही विज्ञानगंगा मुंबईत आणायची ती कोणाच्या बळावर ? सुदैवाने त्यावेळी टी.आय.एफ.आर. येथे असलेले डॉ. जयंत नारळीकर डॉ. कुमार चित्रे व डॉ. बालू यांनी त्यासाठी मदत करायचे आश्वासन दिले. प्रख्यात वास्तुविशारद कादरी यांनी या वास्तची रचना करण्याचे मान्य केले. मुख्य अडचण होती , ती संचालकपदासाठी विज्ञानाच्या प्रसाराची आवड असणारा संशोधक शोधण्याची. डॉ. अरविंद भटनागर या सौर शास्त्रज्ञाच्या रूपाने ती पूर्ण झाली. अनेक अडचणींवर मात करत दि. ३ मार्च १९७७ रोजी मुंबईत नेहरू तारांगणाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले.
आज २६ वर्षांनंतरही तारांगणातर्फे खगोल विज्ञानाची गोडी लावण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

अगदी सर्वप्रथम बनवलेला ' नियती बरोबर भेट ' (Tryst with Destiny) या कार्यक्रमाने तारांगणाची सुरुवात झाली. आता तारांगणात मराठी , हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये मंगळवार ते रविवार दररोज चार कार्यक्रम सादर केले जातात. तारांगणाला सोमवारी सुट्टी असते. स्थापनेपासून आजवर तारांगणातर्फे ३० विविध कार्यकमांची निर्मिती करण्यात आली आहे. अर्थात कार्यकमांची तयारी करताना केवळ विज्ञान किंवा वैज्ञानिकांचा सहभाग असून भागत नाही. संहिता तयार करताना भाषा , कला , नाट्य , संगीत , ध्वनिमुद्रण इत्यादी अनेक घटकांना विचारात घ्यावे मागते. तसे झाल्यासच कार्यक्रम रोचक व सहज , सोप्या भाषेत सर्वांना समजेल असा होतो.

तारांगणाच्या घुमटात ६०० लोक बसू शकतात. आता जुने तंत्रज्ञान (जुना प्रोजेक्टर) जाऊन त्याच्या जागी ' डीजीस्टार-३ ' हे नवे कम्प्युटरकृत तंत्रज्ञान वापरले जाते. आठ कम्प्युटरांच्या साह्याने अंतराळातील वैविध्यपूर्ण घडामोडींचे दर्शन सहा प्रोजेक्टरच्या मदतीने घुमटावर घडते. खाली बसण्याच्या खुर्चीची पाठ अगदी मागे नेत जवळ-जवळ झोपल्यासारख्या स्थितीत जाऊन घुमटाकडे बघावे लागते. त्यामुळे खुल्या पटांगणात आकाशाखाली झोपल्याचा आभास निर्माण होतो. कृत्रिम आकाश बघताना सर्वजण हरखून जातात. या दुर्मिळ अनुभवाचे आकर्षण त्यामुळे वाढत जाते व लोक मोठ्या संख्येने तारांगणाकडे वळतात. गेल्या २६ वर्षांत सुमारे एक कोटी ३२ लाख लोकांनी असे कार्यक्रम पाहिले आहेत. यावरूनच तारांगणाची लोकप्रियता लक्षात येईल.

तारांगणाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर सर्व प्रथम ग्रहमालेची प्रतिकृती दिसते. सूर्याभोवती फिरणारे ग्रह व त्यांच्या भोवती फिरणारे उपग्रह बघत येणारा प्रत्येकजण या कालातीत दुनियेत प्रवेश करतो. मंगळाच्या पृष्ठभागावरील दृश्य , चांद्रदेखावा व अनेक संशोधकांची तैलचित्रे आपल्याला खिळवून ठेवतात. वेगवेगळ्या ग्रहांवर तुमचे वजन किती असेल हे दाखवणारे वजनकाटे सर्वांत महत्त्वाचे आकर्षण ठरते. जोडीला सहज भाषेतील माहिती आपल्यामधील जिज्ञासा जागृत करते.

कृत्रिम ग्रह-तारे बघणाऱ्यांना बरेचदा दुर्बिणीतून प्रत्यक्ष आकाशाकडे बघायची इच्छा होते. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणून तारांगणातर्फे दर रविवारी सायंकाळी सात ते आठ या वेळात दुर्बिणीतून विनामूल्य आकाशदर्शन घडविले जाते. त्याव्यतिरिक्त विविध खगोलीय घटना असल्यास तारांगणाकडे आपसूकच लोकांची पावले वळतात. त्याला प्रतिसाद देत तारांगणाच्या वतीने अशा खगोलीय घटना सर्वसामान्य लोकांना दाखवण्याची सोय केली जाते. सूर्य-चंद्र ग्रहणे , गुरू-शनी ग्रहांचे दुर्बिणीतून निरीक्षण , उल्का वर्षाव या व अशा अनेक घटनांच्या वेळी नेहरू तारांगण विशेष सोय करते.

तारांगणाचा एक मोठा उपयोग पावसाळ्यात होतो. भारतासारख्या देशात जून ते सप्टेंबर असे चार महिने पावसाळा असतो. त्यावेळी बऱ्याचवेळा सूर्य दडी मारून बसलेला असतो. आकाशही दिसेनासे होते. अशावेळी तारांगणाचा वापर करून आकाशदर्शन घेता येते.

आत्ता तुम्ही मुंबईतून आकाश बघत असाल आणि काही दिवसांनी अगदी उत्तरेला जाऊन जम्मूसारख्या ठिकाणी आकाश पाहणार असाल , तर तेथे ताऱ्यांची स्थाने वेगळीच भासतात. उत्तरेला गेल्यास ध्रुव तारा क्षितिजसापेक्ष वर सरकतो. जागा बदलल्यानंतर आकाशातील फरक काय असतो , याचा अभ्यास तारांगणामुळे करता येतो. खगोल ऑलिम्पियाड ( Astro Olympiad) या सपर्धेसाठी दरवर्षी भारतीय चमू जातो. ही स्पर्धा ज्या देशात , ज्या ठिकाणी असेल , त्या ठिकाणचे आकाश नेहरू तारांगणात दाखवून आपल्या चमूला तेथल्या आकाशाचा सराव करून दिला जातो.

खगोल मंडळासारख्या हौशी निरीक्षक संस्था गेली अनेक वर्षे तारांगणाच्या प्रसारकांच्या हातात हात घालून खगोलप्रसाराचे कार्य करत आहेत. कृत्रिम आकाश बघून मन न भरलेले हौशी निरीक्षक मग वांगणी येथे प्रत्यक्ष आकाशाखाली उभे राहून सर्वसामान्यांना रात्रभर आकाश दाखवतात. पाऊण तासाचे तारांगणाचे कार्यक्रम सुरू होतात व संपतात. पण तारांगणाने लावलेली खगोलजिज्ञासा लोकांना स्वस्थ बसू देत नाही. त्यातूनच पुढे हौशी निरीक्षक तयार होतात. त्यातील काही पुढे संशोधक , प्राध्यापक होतात. काही विज्ञानप्रसारक होतात. बरेचजण विज्ञाननिष्ठ विचारसरणीची शिदोरी सोबत घेऊन जातात. तारांगणाची स्थापना करताना हाच उद्देश संस्थापकांचा असावा. तो उद्देश बऱ्यापैकी सफल झाल्याचे नमूद करावेसे वाटते.

मुंबईत भटकंती करणाऱ्यांनी जरूर वरळीत जावे. तारांगणाच्या घुमटाखाली थोडावेळ बसावे. भरदुपारी होणाऱ्या रात्रीचा अनुभव घ्यावा. गावी मोकळ्या शेताच्या बांधावरून केलेल्या आकाश निरीक्षणाच्या आठवणी ताज्या कराव्यात. त्यासाठी तरी नेहरू तारांगणाला एकदा तरी भेट द्या.