Wikipedia

Search results

Saturday 30 November 2013

नागरी सहकारी बँक

सहकारी बँका            
सर्वंकष विकासाच्या पायावर सहकारी चळवळीची पुनर्मांडणी आवश्यक
आपल्या देशातील सहकारी चळवळ व ग्रामीण विकास यांच्या पुनर्मांडणीचा मुळापासूनच फेरविचार करणेचा कालावधी सध्या चालू झाला आहे. ब्रिटीश राजवटीच्या काळात ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना शेतीविषयक गरजा वेळेवर भागविता याव्यात म्हणून, पतपुरवठ्याची रचना करण्याचा निर्णय झाला व त्यातून १९०४ चा पहिला सहकारी कायदा संमत करण्यात आला. २००४ साली आपल्या सहकारी चळवळीचा शताब्दी उत्सव साजरा करणार आहोत, त्यामुळे गेल्या १०० वर्षात या देशातील सहकारी चळवळ, या देशातील शेती व्यवसाय, या देशातील शेती पतपुरवठ्याची व्यवस्था आणि एकूण ग्रामीण विकास या सर्वांचे सिंहावलोकन करुन फेरमांडणीच्या दिशा आपल्याला ठरवाव्या लागणार आहेत.
भारत सरकारच्या आकडेवारीनुसार स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात आपल्या देशातील उद्योगधंद्याचे क्षेत्र बर्‍याच मोठ्या प्रमाणावर विकसित झाले असतांनासुध्दा आपल्या देशातील एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी ३२ टक्के उत्पन्न हे केवळ शेती या एका विषयातून मिळते. हे ३२ टक्के उत्पन्न देशाची ६८ टक्के ग्रामीण लोकसंख्या जगविते. याचा विचार आपल्याला सध्याची आव्हाने सोडवितानासुध्दा लक्षात घ्यावा लागेल. यासंबंधात, दोन श्रेष्ठ व्यक्तींची वक्तव्ये लक्षात घेण्यासारखी आहेत. रामचरित मानस हा ग्रंथ आपण कां लिहिला याबद्दल संत तुलसीदासांचा असा दोहा आहे की,
खेती न किसान को, भिखारी को भिख न मिली
वणीननो विजन न, चोरो को चोरी
जिवीका विहीन लोक, सिद्य मान शोचक्स
कहे एक एकनको, कहा जाई जाई कहा मरी
पंडित नेहरूंनी म्हटलेले आहे,आम्हाला सहकारी चळवळीला पर्याय पाहिजे असेल तर तो एकच पर्याय आहे तो म्हणजे सर्वनाश. एकविसाव्या शतकातील आपल्या देशातील सहकारी चळवळ, आज या सर्वनाशाच्या टोकावर उभी आहे आणि भारतातल्या सामान्य माणसाची अशी प्रतिज्ञा आहे की आम्ही, कोणत्याही परिस्थितीत सहकारी चळवळीच्या आधारानेच आमचे जीवन सुखी व समृध्द करु.
स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ग्रामीण विकासाचा निश्चित मार्गदर्शनासाठी म्हणून १९५४ साली पहिली ग्रामीण पतपुरवठा सर्व कमिटी गोरवाला कमिटी नियुक्त केली. आमची ग्रामीण पतपुरवठा याची सहकारी पध्दती ही गोरवाला समितीच्या शिफारसीनुसार त्रिस्तरीय रचनेवर आधारलेली आहे. सहकारी नागरी बँका या गावाच्या विकास सोसायटीप्रमाणेच प्राथमिक सहकारी बँका या श्रेणीतच मोजल्या जातात. पर्यायाने नागरी बँकासुध्दा ग्रामीण विकासाच्या रचनेतील एक महत्वाचा दुवा आहे असे गोरवाला समितीने गृहीत धरलेले आहे. गोरवाला समितीनंतर भारत सरकारने १९६९ साली रुरल क्रेडिट रिव्ह्यू कमिटी नियुक्त केली होती. १९८१ साली शेती व ग्रामीण विकास यासाठी संस्थात्मक निधीची उपलब्धता यासाठी समिती नेमली होती आणि १९८९ साली खुली कमिटी नियुक्त केली होती. यासर्व कमिट्यांच्या शिफारसी सहकारी पतव्यवस्था बळकट ठरविण्याच्या दृष्टिकोनातून झालेल्या आहेत. परंतु त्यातल्या फारच कमी प्रमाणात अंमलात आलेल्या आहेत. विशेषत: खुली कमिटीने मुलभूत परिवर्तनाच्या बर्‍याच शिफारसी सुचविल्या होत्या. परंतू त्याची दखल भारत सरकार अगर रिझर्व्ह बॅकेने गांभीर्याने घेतली नाही.
रिझर्व्ह बँकेच्या या पतधोरणामुळे देशापुढे व सहकारी चळवळीपुढे पुढील प्रमुख प्रश्न निर्माण झालेले आहेत.
१. स्वातंत्र्यानंतर पहिल्या नियोजन मंडळाने सहकारी चळवळ ही एक सामाजिक परिवर्तनाची चळवळ असून देशातील सामान्य नागरिकाचा देशाच्या विकासास सहभाग होण्यासाठी हे एकमेव साधन आहे. म्हणून सहकारी संस्थांना व सहकारी उद्योगांना सहकारी व्यवसायाच्या बरोबरीने स्थान देण्यात यावे.
२. नियोजन मंडळाच्या या धोरणानुसार पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून सातव्या पंचवार्षिक योजनेपर्यंत पंचवार्षिक योजनेच्या आराखड्यांमध्ये सहकारी चळवळीच्या अध्यायाचा समावेश करण्यात आलेला होता. आज आठव्या योजनेपासून सहकारी चळवळीचा अध्याय वगळण्यात आलेला आहे. पर्यायाने सहकारी चळवळ ही सामाजिक चळवळ नसून खाजगी उद्योग व्यवसाय अगर संघटन आहे असे स्वरुप त्याला प्राप्त झालेले आहे. या बाबतीत धोरणाची स्पष्टता करुन घेण्याची अत्यंत जरुरी आहे.
३. आपल्या देशातील बहुसंख्य शेतकरी हा कर्जबाजारी आहे. त्याच्या जमिनी सावकाराच्या ताब्यात आहेत, हे लक्षात घेऊन कर्जदार शेतकर्‍याच्या जमिनीमध्ये उद्या उगवणारे पीक हे आज तारण म्हणून धरावे व त्याच्या आधारावर त्याला पीक कर्ज द्यावे, ही योजना सर्वप्रथम वैकुंठभाई मेहता यांनी चालू केली. आजची संपूर्ण सहकारी चळवळ या एका धोरणाच्या आधारावर उभी आहे. कै. वैकुंठभाई मेहता यांचे हे धोरण चुकीचे होते का आज ते कालबाह्य झाले आहे याचा निर्णय नवीन धोरण ठरविताना करावा लागेल.
४. वैज्ञानिक संशोधने कितीही लागली तरीसुध्दा शेती हा निसर्गावर अवलंबून असणारा व्यवसाय आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचे वेळी शेतकर्‍या ला साहाय्य करण्याच्या योजना असाव्यात अशी अनेक वर्षांपासून शेतकर्‍यांची मागणी होती. गेल्यावर्षीपासून भात सरकारने `सर्वंकष पीक विमा योजना' लागू केली आहे. परंतु तलाठ्याने काढलेली नजर-आणेवारी व गावातील पिकाचे प्रमाण या बाबतीत कोणताही दृष्टिकोन सरकारने बदलला नसल्याकारणाने सर्वंकष पीक विमा योजना सध्या निरुपयोगी किंवा शेतकर्‍याला भुर्दंड पाडणारी अशी आहे.
५. शेतकर्‍या ला कोणत्याही सवलती अगर सबसीडी सरकारने देऊ नयेत पण कारखानदारी अगर अन्य उद्योगाप्रमाणे शेतीमालाचा उत्पादन खर्च व १०% नफा या किंमती शेतकर्‍याला दिल्या जातील अशी व्यापारव्यवस्था निर्माण होत नाही, तोपर्यंत केवळ पतपुरवठ्याच्या व्यवस्थेमुळे शेती व शेतकरी यांचे जीवन कधीही संपन्न होणार नाही. सरकारने आधार किमतीऐवजी शेतीमालाला रास्त किफायतशीर किमती यांच्यात जे समाजाला माल, धान्य विकताना, सबसीडी विक्री दरात द्यावी म्हणजे सबसीडीच्या नावावर याला उगाचच झोडपले जात आहे ते थांबेल.
६. आपल्या सर्व लहानमोठ्या बँकांना किंबहुना देशपातळीवरील राज्य पातळीवरील , जिल्हा पातळीवरील आणि जागतिक पातळीवरील सर्व बँकांना रिझर्व्ह बँकेने जागतिक बँकेचे नॉर्म्स लावलेले आहे. रिझर्व्ह बँकेच्या धोरणामुळे बँकाच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढत चालल्या आहेत. भारत सरकारने आपल्या देशातील बँकिंग व्यवसायाचा स्वतंत्रपणे अभ्यास करुन आपल्या देशातील ज्या बँका जागतिक पातळीवर काम करणार आहेत, त्यांनाच फक्त जागतिक बँकांचे नॉर्म्स लावावेत. देशांतर्गत अन्य सर्व बँकांना आपल्या देशाच्या धोरणानुसार जरुर ते सर्व नॉर्म्स लावावेत.
७. नागरी सहकारी बँकाना गेल्या दोन वर्षापासूनच ग्रामीण भागात शाखा काढणे व शेती व्यवसायाला कर्जव्यवहार करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. गेली सुमारे ३० वर्षे नागरी बॅंका अशा कर्ज व्यवहाराची मागणी करीत होत्या. नागरी बँका या लोकांनी काढलेल्या असतात. त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात समाजाचा त्या विश्वास संपादन करतात व समाजातूनच ठेवीच्या रुपाने निधी एकत्रित करुन त्याच्यावर कर्जव्यवहार करतात. सरकारकडे कोणत्याही पैशाची मागणी न करता स्वावलंबनावर चाललेला एकमेव सहकारी व्यवसाय म्हणजे नागरी बँका होय. नागरी बँका आज ग्रामीण भागात सफाईदारपणे कर्जव्यवहार करु लागलेल्या आहेत. नागरी बँकांची पहिली शिखर बँक महाराष्ट्रात निघालेली असून या शिखर बँकेच्या नेतृत्वाखाली साखर कारखाने, सूत गिरण्या अशा प्रकल्पांना नागरी बँका, मोठा कर्जपुरवठा करुन ग्रामीण व शेती विकास क्षेत्रात उत्तम तऱ्हेने कामगिरी पार पाडू शकताता याचा अनुभव महाराष्ट्राला आलेला आहे.
८. शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या अनुषंगाने जिल्हा बँकांना जो कायदेशीर संरक्षण दिलेले आहे. त्याची उपलब्धता नागरी बँकाना अद्याप करुन देण्यात आलेली नाही. नागरी बँकांना रिझर्व्ह बँकेने केवळ नागरी बँक म्हणण्याच्या ऐवजी विभागीय विकास बँक - रिजनल डेव्हलपमेंट बँक - असा दर्जा दिला तर या बँका, जिल्हा बँकाच्या बरोबरीने ग्रामीण विकासाचे काम करु शकतील. नागरी बँकांच्या ठेवी गोळा करण्याची क्षमता अनुभवी अधिकारी वर्ग व त्यांची स्वत:चे भांडवल या सर्वांचा विचार करुन या बँकावरील बंधन सरकारने व रिझर्व्ह बँकेने कमी केली, तर उद्याच्या ग्रामीण विकासाच्या व शेती विकासाच्या अग्रदूत म्हणून नागरी बँका उत्तम तऱ्हेने काम करु शकतात. सरकारने या सर्व धोरणांचा विचार तातडीने केला पाहिजे. आपल्या देशातील सहकारी चळवळ ही, या पुढच्या काळात पूर्णपणे ग्रामीण विकासाच्या आधारावर चालणार आहे. जागतिक स्पर्धेला तोंड देण्याचे आपल्या देशाकडे ग्रामीण विकास हाच एकमेव मार्ग आहे. शासनाने व रिझर्व्ह बँकेने स्वत:च्या धोरणांचा फेरविचार करुन नागरी बँकांना खुलेपणाने काम करुन देण्याची संधी निर्माण करुन दिली, तर या देशातील ग्रामीण विकासाला महत्वाचा हातभार नागरी बॅंकांना खुलेपणाने काम करु देण्याची संधी निर्माण करुन दिली तर या देशातील ग्रामीण विकासाला महत्वाचा हातभार नागरी बँका लावू शकतील एवढी त्यांची क्षमता आहे.
शेरी नाला योजना     पीडीएफ   
सांगली शहराजवळील वाहणारा शेरीनाला मुख्यत: पावसाचे पाणी व शेतीसाठी वापरलेले पाणी वाहून नेण्यासाठी वापरण्यात येत असे. हे पाणी साधारणपणे ४० चौ. कि.मी. एवढ्या परिसरातून येते. या परिसरात आता लोकवस्ती इतक्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे की या परिसरातील ८ ते १० लाख लिटर प्रतिदिन एवढे सांडपाणी या नाल्यामध्येच येते. घरगुती सांडपाण्याव्यतिरिक्त काही कारखान्यांचे सांडपाणी या नाल्यामध्ये पूर्वी येत असे. परंतु सध्या ते थांबले आहे. भविष्यांतसुध्दा कोणत्याही कारखान्याचे सांडपाणी या नाल्यामध्ये येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. ही काळजी घेण्यात येईल असे गृहीत धरूनच शेरीनाला शुध्दीकरण योजना फक्त घरगुती सांडपाण्यासाठी प्रायोजित करण्यात आली आहे.

सहकार ठेवीदारांचा की कर्जदारांचा?
'सहकारातील  कोणत्याच मूलभूत तत्त्वांचे पालन नागरी सहकारी बँकांकडून होत नाही' असा निष्कर्ष रिझव्‍‌र्ह बँकेच्या अखत्यारीतील  अभ्याससंस्थेने काढला आहे. या पाश्र्वभूमीवर सहकारी बँकांचे व्यवस्थापन चांगल्या लोकांकडे जाऊन ठेवीदारांचे हित कसे जपता येईल, याची चर्चा करणारा लेख..
रिझव्‍‌र्ह बँकेच्या  पुणे येथील 'कॉलेज ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल बँकिंग' या संस्थेने ९६० नागरी सहकारी बँकांना सुमारे २७ प्रश्नांची प्रश्नावली पाठवून, त्यातून आलेली उत्तरे तसेच गेल्या पाच वर्षांतील सांख्यिकी माहिती आणि रिझव्‍‌र्ह बँकेचे तपासणी अधिकारी व अन्य संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून, एक अभ्यास-अहवाल गेल्या महिन्यात पुण्यातील एका चर्चासत्रात मांडला. ९६० पैकी ४२३ (४४ टक्के) बँकांनीच प्रश्नावलीला उत्तरे दिली, हे धक्कादायक होतेच, परंतु 'सहकारातील सातपैकी कोणत्याच मूलभूत तत्त्वांचे पालन नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राकडून होत नाही' असा निष्कर्ष रिझव्‍‌र्ह बँकेच्या अखत्यारीतील या अभ्याससंस्थेने काढला होता. सहकारी बँकांत होणाऱ्या निवडणुकांतील मतदान २० टक्क्यांपेक्षा कमी असते, एकाच कुटुंबातील अनेकांचा समावेश संचालक मंडळांत दिसून येतो, तेच ते संचालक वर्षांनुवर्षे कायम राहतात, सहकारी बँकांचे व्यवहार आणि व्यवस्थापन यांत सभासदांचा सहभाग नगण्य असतो,  हे सभासदत्व नियमानुसार खुले व ऐच्छिक असूनही प्रत्यक्षात ओळखीच्या व्यक्ती व कर्जदार  यांच्यापुरतेच मर्यादित राहते, असे सहकारी बँकांबाबत काढलेले निष्कर्ष अभ्यासकांच्या दृष्टीने जरी धक्कादायक असले तरी सहकाराशी संबंधित असणाऱ्या सर्वाना आणि सामान्य जनतेलाही गेल्या कित्येक वर्षांपूर्वीपासूनच हे सत्य माहीत आहे हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे आपल्या शोध-निबंधातून रिझव्‍‌र्ह बँकेने फार काही वेगळा शोध लावला, असे म्हणता येणार नाही; परंतु यामुळे सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे यावर निश्चितच विचारांची प्रक्रिया सुरू होईल व ती व्हावी अशी अपेक्षा आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेने आपल्या अहवालात यावर उपाययोजना सुचविताना सभासदांच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करण्याबरोबरच सहकाराच्या सात मूलभूत तत्त्वांचा अंगीकार, वार्षिक सभेतील सभासदांच्या क्रियाशील सहभागात वाढ, मतदान वाढविण्यासाठी ऑनलाइन मतदानाची सुविधा, संचालक मंडळाच्या निर्णयप्रक्रियेत व्यावसायिकता आणणे, संचालकांच्या एकूण मुदतीवर र्निबध, इत्यादी उपाय सुचविले आहेत. याचबरोबर सदर चर्चेमध्ये आपले विचार मांडणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोठे कार्यक्षेत्र असणाऱ्या बँकांच्या जिल्हा/राज्यस्तरीय वार्षिक सभांचे आयोजन, अविरोध निवडणुकांवर मर्यादा, मतदान न केल्यास लाभांश न देण्याची तरतूद, संचालक मंडळ सभांना रोटेशन पद्धतीने काही क्रियाशील सभासदांना उपस्थितीची मुभा असे उपाय सुचविले आहेत.
या पाश्र्वभूमीवर कोणत्याही सहकारी संस्थेवर केवळ क्रियाशील सभासदांचेच नियंत्रण असावे हे मान्य करीत केंद्र शासनाच्या ९७ व्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने महाराष्ट्रासह अनेक राज्य सरकारांनी आपापल्या सहकार कायद्यात आवश्यक ते बदल केले आहेत. नागरी सहकारी बँकांच्या बाबतीत मात्र बँकिंग व्यवसाय करणाऱ्या सहकारी संस्थांवरील नियंत्रण हे ठेवीदार सभासदांच्या हाती असावे, असा रिझव्‍‌र्ह बँकेचा आग्रह असताना प्रत्यक्षात मात्र ते कर्जदार सभासदांच्या हाती असल्याचे दिसून येते. सहकारी बँका या ठेवी स्वीकारणे व कर्ज देण्याचा व्यवसाय करतात त्यामुळे ठेवीदार आणि कर्जदार या दोन्ही व्यक्ती संस्थेच्या व्यवहारात सहभागी होत असल्याने त्या क्रियाशील ठरतात; परंतु कायद्याने केवळ सभासदांनाच कर्ज देता येत असल्याने त्यांना सभासदत्व दिले जाते, मात्र ठेवीदारांच्या बाबतीत ही अट नसल्याने ठेवीदारांना सभासद करून घेतले जात नाही. यामुळे संपूर्ण सहकार क्षेत्रामध्ये केवळ सहकारी बँकिंगचे एकमेव क्षेत्र असे आहे की जेथे बिगर सभासदांकडून ठेवी स्वीकारल्या जातात व त्यांचे वाटप केवळ सभासदांनाच कर्जरूपाने केले जाते. वास्तविक इतर सर्व सहकारी संस्थांमधून जो सभासद सहकारी संस्थेला पुरवठा करतो तो क्रियाशील सभासद ठरतो. उदा. साखर कारखान्यांमध्ये ऊस उत्पादक शेतकरी ऊस देतो, दुग्ध संस्थेत सभासद दुधाचा पुरवठा करतो, शेती मालाच्या संस्थेत सभासद शेतमाल पुरवितो. गृहनिर्माण संस्थेत मेंटेनन्स देणारा क्रियाशील ठरतो; परंतु सहकारी बँकिंग संस्थेत मात्र ठेव ठेवणाऱ्या व्यक्तीला सभासद करून घेण्याचे कायदेशीर बंधन बँकांवर नसल्याने, बँकांच्या खेळत्या भांडवलात ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत हिस्सा असणाऱ्या ठेवीदारांचे नियंत्रण व्यवस्थापनावर नसते, ही वस्तुस्थिती आहे.
बँकिंगमध्ये कर्जदार सभासदांपेक्षा ठेवीदारांचे हित जोपासणे आवश्यक असल्याच्या पाश्र्वभूमीवर रिझव्‍‌र्ह बँकेच्या मालेगम समितीच्या अहवालानुसार बँकांच्या एकूण ठेवींपैकी किमान ५० टक्के ठेवी ज्यांच्या हातात आहेत असे सर्व ठेवीदार सहकारी बँकांचे 'मतदार सभासद' असणे अनिवार्य केल्यास या बँकांवर ठेवीदारांचे नियंत्रण राहून ज्यांच्या हातात आपला पैसा सुरक्षित राहील, त्यांनाच निवडून देण्याकडे या ठेवीदारांचा कल असणार व त्यामुळे चांगल्या लोकांच्या हातात या बँकांचे व्यवस्थापन राहील व ठेवीदारांचे हित जाईल, असे रिझव्‍‌र्ह बँकेस वाटते. यामुळे यासंबंधात रिझव्‍‌र्ह बँकेने सर्व राज्यांच्या सहकारी आयुक्तांना या विषयावर त्यांचे मतप्रदर्शन करण्याचे नुकतेच आवाहन केले आहे. मात्र एकूण ठेवींच्या ५० टक्के मूल्य असणारे ठेवीदार हे सभासद असणे आवश्यक असण्याची अट न घालता केवळ ठेवीदारांकडूनच ठेवी स्वीकारता येतील, अशी अट घातल्यास ठेव असेपर्यंत तो ठेवीदार क्रियाशील सभासद व ठेव नसताना अक्रियाशील सभासद राहिल्याने केवळ क्रियाशील ठेवीदारांचेच संस्थेवर नियंत्रण राहील, तसेच अक्रियाशील सभासदांचे सभासदत्व विशिष्ट कालावधीनंतर संपुष्टात आणण्याची तरतूद नवीन कायद्यात असल्याने अक्रियाशील सभासदांची संख्या वाढण्याचाही धोका राहणार नाही. कर्जदारांच्या शेअर्स लिंकिंगबद्दल रिझव्‍‌र्ह बँकेनेच परिपत्रक काढून ते जसे बँकांना अनिवार्य केले आहे, तसेच ठेवीदारांनाही किमान शेअर्स देणे बँकांना अनिवार्य केल्यास, ठेवीदारांच्या नियंत्रणाचा रिझव्‍‌र्ह बँकेचा उद्देश सफल होण्याबरोबरच, ठेवीदारांनादेखील ते सभासद झाल्याने सहकार न्यायालयाचा पर्याय उपलब्ध होईल. सभासद असल्याने ठेवींवरील व्याजावर आयकर कपात करण्याचे बंधन बँकांवर राहणार नाही. केवळ सभासदांच्याच ठेवी संस्थेकडे असल्याने अशी बँक अडचणीत आल्यास तिचा बँकिंग परवाना रद्द करून तिचे पतसंस्थेत रूपांतर करता येईल. त्यामुळे संस्थेचे अस्तित्व अबाधित राहील.
वास्तविक मतदारांवर प्रभाव आणणारे कोणतेही कृत्य आपल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बेकायदा ठरते. येथे तर  ज्या ओळखीच्या व्यक्तीस कर्ज देत सभासद करून घेऊन उपकृत केले जाते, त्याचे मतदान हे कोणाला होणार हे उघड असल्याने रिझव्‍‌र्ह बँकेच्या सूचनेनुसार सहकारी बँकांवर ठेवीदारांचे नियंत्रण राहिल्यास रिझव्‍‌र्ह बँकेच्या शोधनिबंधातील अनेक समस्यांची उकल होईल, असे वाटते. हा विचार प्रवाहाच्या विरुद्ध वाहत असला तरी नागरी सहकारी बँकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तो आवश्यक वाटतो. केवळ सभासदांचे हित जोपासणारा सहकार कायदा आणि केवळ ठेवीदारांचे हित जोपासणारा बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी भविष्यात मालेगम समितीच्या सूचनेनुसार रिझव्‍‌र्ह बँकेने वरील विचार अमलात आणल्यास या क्षेत्राला आश्चर्य वाटायला नको.

Saturday 9 November 2013

स्टीव्ह जॉब्स

स्टीव्ह जॉब्स

(इंग्लिश: Steve Jobs) (फेब्रुवारी २४, इ.स. १९५५; सान फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका - ऑक्टोबर ५, इ.स. २०११; पालो आल्टो, कॅलिफोर्निया, अमेरिका) हा एक अमेरिकन व्यवसायिक होता आणि तो ॲपल ह्या अमेरिकन कंपनीचे सहसंस्थापक व मुख्याधिकारी होता. जॉब्स हा पूर्वी पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज‎चा मुख्य व्यवस्थापक होता आणि नंतर तो वॉल्ट डिस्ने कंपनीचा संचालक सदस्य होता. इ.स. १९७० मध्ये जॉब्स याने स्टीव्ह वॉझनियाक, माइक मारक्कुला आणि इतर (ऍपल कंपनीचे सर्व सदस्य) यांच्या समवेत व्यक्तिगत संगणक तयार केला. ऍपल-२ या मलिकेअंतर्गत मॅकिंटॉश नावाची प्रचालन यंत्रणा तयार केली. इ.स. १९८५ मध्ये कंपनीच्या सदस्यांसमावेत झालेल्या वादामुळे त्याने राजीनामा दिला आणि नेक्स्ट या नावाने व्यवहारात आणि उच्च शिक्षणात उपयोगी होईल अशी संगणकीय यंत्रणा (संगणकाचा वापर) किंवा प्रणाली तयार करणारी कंपनी स्थापन केली. इ.स. १९९७ साली 'नेक्स्ट'चे 'ऍपल'मध्ये विलीनीकरण झाले, त्याला पुन्हा 'ऍपल'मध्ये म्हणून स्थान मिळाले. यावेळी त्याच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
जॉब्स याला व्यवहारिक जगाच्या इतिहासात एक सणकी, कलंदर, सिलिकॉन व्हॅलीचे ठेकेदार म्हणून ओळखले जाते.[ संदर्भ हवा ] त्याला सौंदर्यपूर्ण वस्तू बनवण्याची व वापरण्याची आवड असून याच कामासाठी त्याने वाहून घेतले आहे. त्याने प्रकृतिअस्वास्थ्य व अन्य वैयक्तिक कारणांसाठी २९ जून, इ.स. २००९ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा दिला. आयफोन, 'आयपॉड', 'आयपॅड' हे लोकप्रिय, बहूपयोगी उत्पादने त्याच्यामुळेच बाजारात आले[ संदर्भ हवा ].
स्टीव जॉब्सला उपभोक्ता संगणकक्षेत्रातील नवीनतेचा व अविष्कारचा जनक म्हणून संबोधले जाते. मृत्यू स्टिव जॉब्सचा कर्क रोगामुळे मृत्यू झाला.

 स्टीव जॉब्स...स्टे हंग्री...स्टे फुलीश.
 स्टीव जॉब्स...स्टे हंग्री...स्टे फुलीश..हाच त्याच्या जगण्याचा मंत्र ..अवघ्या 56 वर्षाच्या आयुष्यात स्टीव नेहमी भूकेला राहिला त्यामुळेच तो यशाची शिखरं चढत राहिला. त्याला वेड होतं कामाचं, नाविन्याच्या शोधाचं...

एका कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थीनीच्या पोटी स्टीवचा जन्म झाला. म्हणजे स्टीव हे लग्नाशिवाय झालेलं अपत्य.  त्याला दत्तक देण्याचा निर्णय त्याच्या आईनं घेतला पण एका अटीसहीत. दत्तक आईवडील हे ग्रॅज्युएट असावेत. .पण तसं झालं नाही...ज्यांनी स्टीवला दत्तक घेतलं त्यांनी स्टीवच्या आईला वचन दिलं की एके दिवशी स्टीव नक्कीच कॉलेजमध्ये शिकायला जाईल...आणि गेलाही.

स्टीव १७ वर्षाचा असताना रीड कॉलेजात दाखल झाला..पण त्याचं मन काही तिथं रमेना. अवघ्या सहा महिन्यात तिथून तो बाहेर पडला. फार पैसा नसताना स्टीवनं केलेलं धाडस रस्त्यावर आणणारं होतं. झालयही तसच. संध्याकाळच्या एका जेवणासाठी स्टीवला काही मैलाची पायपीट करत हरे कृष्णा मंदीर गाठावं लागायचं. पण कॅलीग्राफीमध्ये स्टीव माहीर होता. मग काय स्टीवनं घराच्या गॅरेजमध्येच अॅपल कंपनी सुरु केली. सोबत होता मित्र वॉझ.दहा वर्षात अॅपलनं पहिला मॅकिन्टोश कंप्युटर जगाला दिला..त्यातील टायपोग्राफी ही स्टीवच्या कॅलिग्राफीची कमाल होती. वयाच्या तिशीत स्टीव दोन बिलियन डॉलर उलाढाल असलेल्या आणि चार हजार कर्मचारी असलेल्या कंपनीचा मालक बनला
 पण स्टीवचा संघर्ष इथंच संपला नाही..वयाच्या तिशीत ज्या कंपनीची स्थापना  केली त्या अॅपलमधूनच स्टीवला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. कंपनीच्या मॅनेजमेंटशी त्याचा वाद झाला. स्टीव पुन्हा रस्त्यावर आला. परत पैशाचे वांदे झाले पण स्टीवकडं होता तो एक अफलातून मंत्री. स्टे हंग्री स्टे फुलीश.

काहीच महिन्यात स्टीवनं नेक्स्ट आणि पिक्सार या दोन नव्या कंपन्या सुरु केल्या. झपाटून कामाला सुरुवात केली...पिक्सारनं जगातील पहिली अॅनिमेटेड फिल्म तयार केली. जगातला सर्वात मोठा अॅनिमेशन स्टुडिओ याच कंपनीकडे आहे. काहीच वर्षात अॅपलनं नेक्स्ट खरेदी केली..स्टीव पुन्हा अॅपलमध्ये परतला.

स्टीवच्या आयुष्यात शांतता कधीच नांदली नाही..२००४ मध्ये स्टीवला कॅन्सर झाला...तोही स्वादुपिंडाचा...डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार स्टीव थोड्याच दिवसाचा साथीदार होता..पण एके दिवशी तपासणीदरम्यान अतिशय दुर्मिळ असलेल्या स्वादुपिंडाच्या कॅन्सरवर शस्त्रक्रिया केल्यास तो बरा होऊ शकतो असं डॉक्टरांच्या लक्षात आलं...

स्टीववर शस्त्रक्रिया झाली..काही दिवसांच्या विश्रांतीनंतर स्टीव पुन्हा कामात मग्न झाला. अॅपल कम्युटर, मॅकिन्टोश अशा उत्पादनांनी ऍपल आता जगप्रसिद्ध होती. पण आयफोन, आयपॅड, आयपॉड अशा अनेक शोधांनी स्टीव जगभरातल्या तरूणांचा आणि उद्योजकांचा ताईत झाला. खुद्द बिल गेटसनं कितीतरी वेळेस स्टीवच्या अॅपलची उत्पादनं मायक्रोसॉप्टपेक्षा किती तरी सरस असल्याचं कबुल केलं.  पण सौंदर्याला कदाचित शाप असावा. स्टीव आता छप्पन वर्षाचा झाला. पण गेल्या वर्षभरात त्याच्या आजारानं पुन्हा डोकं वर काढलं. आता आपण फार काळ जगणार नाही, याची जाणीवही स्टीवला झाली असावी.

त्यामुळेच काही महिन्यांपूर्वी त्यानं अॅपलच्या सीईओपदाचा राजीनामा दिला. कंपनीच्या अपेक्षा आहेत त्या पुर्ण करू शकत नसल्याची खंत स्टीवनं व्यक्त केली. त्यावेळेस जग हळहळलं. अखेर काल अॅपलनं आणखी एक वर्ल्ड क्लास प्रोडक्ट आयफोन ४ एस बाजारात आणला असतानाच त्याचं निधन झालं. स्टीव आता आपल्यात नाही पण त्यानं निर्माण केलेले प्रोडक्ट जगभरातल्या लोकांच्या हातात आहेत आणि ते एकच संदेश देत राहातात..स्टे हंग्री स्टे फुलीश.


 एप्पल कंपनी आणि पिक्सार एनिमेशन स्टुडिओचा प्रमुख कार्यकारी अधिकारी (CEO) स्टीव जॉब्स यांचे पदवीदान समारंभातील भाषण आहे, जून १२, २००५

 आज तुमच्याबरोबर येथे जगातील एका सर्वोत्क्रुष्ट महाविद्यालयातील तुमच्या पदवीदान समारंभाला मला अतिशय अभिमान वाटत आहे.मी महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण केल नाही.खरं सांगायचं तर, महाविद्यालयीन पदवीशी माझा हाच एक सर्वात जवळचा संबंध आहे. आज मला तुम्हाला माझ्या आयुष्यातील तीन गोष्टी सांगयच्या आहेत. येवढंच. फार काही नाही. फक्त तीन गोष्टी.
 पहिली गोष्ट आहे ठिपके जोडण्याची.
 मी रीड महाविद्यालयातून पहिल्या ६ महिन्यांनंनर बाहेर पडलो, पण नंतर पुर्णपणे सोडण्यआधी साधारण १८ महिने मी तसाच महाविद्यालयात पडीक होतो. मग मी का सोडून गेलो?
 ह्या गोष्टीला माझ्या जन्मआधी सुरुवात झाली. माझी जन्मदात्री आई एक तरुण, कुमारिका महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती, आणि तिने मला दत्तक देऊन टाकायचे ठरविले. तिला असे प्रकर्षाने वाटले की मला महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्यांन्नी दत्तक घ्यावे, त्यामुळे या सगळ्याची एका वकिलाने आणि त्याच्या पत्नीने माझ्या जन्माच्या वेळीच तयारी केली होती. फक्त जेव्हा मी बाहेर आलो त्यान्नी आयत्या वेळी ठरवले की त्यान्ना खरेतर मुलगी हवी होती. त्यामुळे माझे आई वडील जे प्रतिक्षा यादिवर होते, त्यान्ना मध्यरात्री निरोप आला, आणि विचारलं: "आमच्याकडे अनपेक्षितपणे एक मुलगा झाला आहे; तुम्हाला तो हवा आहे का?" ते म्हाणाले: "नक्कीच". माझ्या जन्मदात्रा आईला नंतर कळाले की माझी आई कधीच महाविद्यालयात गेली नव्हती आणि माझे वडील कधीच माध्यमिक शाळेत गेले नव्हते. तिने शेवटच्या दत्तक विधानांवर सही करायला नकार दिला. थोड्या महिन्यांनी ती नरमली जेव्हा माझ्या पालकांनी वचन दिले की मी कधितरी महाविद्यालयात जाईन.
 आणि १७ वर्षांनंतर मी खरंच महाविद्यालयात गेलो. पण मी भोळसटासारखे असे महाविद्यालय निवडले जे जवळ जवळ स्टॅनफर्ड येवढेच महाग होते, आणि माझ्या मध्यमवर्गीय पालकांची सगळी बचत माझ्या महाविद्यालयाच्या शिक्षणमुल्यावर खर्च होत होती. सहा महिन्यांनंतर, मला त्यात काही तत्थ्य दिसेना. आयुष्यात मला काय करायचे आहे याची मला काहीच कल्पना नव्हती आणि महाविद्यालयात जाण्याने ते मला कसे शोधून काढता येईल याचिही काही कल्पना नव्हती. आणि इथे तर मी माझ्या आईवडिलांनी आयुष्यभर जमवलेले सगळे पैसे खर्च करून टाकत होतो. म्हणून मी असं ठरवलं की 'सगळं नीट होईल' असा भरवसा ठेवून शिक्षणाला रामराम ठोकायचा. त्यावेळी ते सगळंच खूप भीतिदायक वाटलं होतं, पण आता मागे वळून बघताना असं वाटतं की तो माझा सर्वात चांगला निर्णय होता. महाविद्यालय सोडल्यावर मला नीरस वाटणारे पण सक्तीचे विषय मी टाळू शकलो अाणि अावडणाऱ्या विषयांच्या तासांना बसू लागलो.
 ते सगळं काही फारसं रोमहर्षक नव्हतं. मला वसतिगृहात खोली नव्हती म्हणून मी मित्रांच्या खोल्यांमधे फरशीवर झोपायचो, कोकच्या बाटल्या परत करून त्यावरचं पाच पाच सेंटचं डिपॉझिट गोळा करून त्यातून अन्न विकत घ्यायचो आणि दर रविवारी रात्री शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या हरे कृष्ण मंदीरात निदान एक तरी चांगलं जेवण मिळवण्यासाठी ७ मैल चालत जायचो. मला ते सगळं आवडीचं वाटलं. आणि माझं कुतूहल आणि अंतर्ज्ञान यांचा पाठपुरावा करून मला जे काही मिळालं ते बहुतेक सगळं पुढे अनमोल ठरलं. उदाहरणार्थ:
 त्यावेळी रीड कॉलेजातील लेखनशैलीचं शिक्षण बहुधा देशात सर्वोत्कृष्ट असावं. संपूर्ण अावारात प्रत्येक भित्तिचित्र, प्रत्येक ड्रॉवरवरचं प्रत्येक लेबल हे सुंदर हस्ताक्षरात लिहिलेलं असे. मी महाविद्यालय सोडून दिले असल्याने आणि नेहेमीचे विषय घेत नसल्याने, मी लेखनशैलीचा विषय घेऊन ते शिकायचे ठरवले. मी सेरीफ आणि सान सेरीफ अक्षररचने बद्दल शिकलो, विविध अक्षरांमधील विविध अंतराच्या रचने बद्दल शिकलो, मी शिकलो कशी एक महान अक्षररचना महान होते. ते सुंदर आणि ऐतिहासिक होते, कलात्मकतेचा असा एक सुक्ष्म पैलू जो विज्ञान समजू शकत नाही, आणि तो मला आकर्षक वाटला.
 यातील कशाचाही माझ्या आयुष्यात काहीही व्यावहारीक उपयोग नव्हता.पण दहा वर्षांनी, जेव्हा आम्ही पहिल्या Macintosh व्यक्तिगत संगणकाची रचना करीत होतो, तेव्हा ते सगळे मला परत आठवले. आणि ते सगळे आम्ही Mac च्या रचनेत एकत्रित केले. सुंदर अक्षर रचना असलेला तो पहिला संगणक होता. जर मी महाविद्यालयात तो एक विषय घेतला नसता, तर Mac मधे कधीच विविध अक्षर रचना किंवा सम-अंतराची अक्षर रचना नसती. आणि Windows ने फक्त Mac ची नक्कल केली, त्यामुळे दुसरया कुठल्याही व्यक्तिगत संगणकात ती असण्याची शक्यता नाही. जर मी महाविद्यालयातून बाहेर पडलो नसतो, तर मी कधीच सुलेखनाच्या तासिके मधे गेलो नसतो, आणि व्यक्तिगत संगणकात बहुतेक कधीच सुंदर अक्षर रचना आली नसती जी आत्ता आहे. खरंतर मी जेव्हा महाविद्यालयात होतो तेव्हा भविष्यकाळात पाहुन हे ठिपके जोडणे शक्य नव्हते. पण दहा वर्षांनी मागे वळून पाहताना, हे सर्व फारच स्वच्छ दिसत होते.
 परत मुद्दा असा की, तुम्ही ठिपके पुढे भविष्यकळात पाहुन जोडू शकत नाही, तुम्ही फक्त ते मागे वाळून पाहताना जोडू शकता. म्हणून तुम्ही फक्त खात्री बाळगली पाहिजे की भविष्यकाळात हे ठिपके एका प्रकारे जोडले जातील. तुम्ही काही गोष्टिंवर विश्वास ठेवला पाहिजेत - तुमची अंतर्भावना, नशीब, जीवन, कर्म, जे काही. या द्रुष्टिकोणाने माझी कधीच निराशा केली नाहिये, आणि यानेच माझ्या जीवनात आमुलाग्र बदल केला आहे.
माझी दुसरी गोष्ट आहे प्रेम आणि नुकसाना बद्दल.
 मी नशीबवान होतो - मला ज्याची आवड होती ते मला आयुष्यात लवकर सापडले. मी जेव्हा २० वर्षांचा होतो, तेव्हा वॉझ आणि मी माझ्या आई वडिलांच्या गॅरेज मधे एप्पल चालू केली. आम्ही खुप मेहेनत केली, आणि १० वर्षांत आमच्या दोघांच्या गॅरेज मधील कामापासून एप्पल एक २ अब्ज डॉलर्स ची ४००० पेक्षा जास्त लोकांची कंपनी झाली. आम्ही आमचं सर्वोत्क्रुष्ट निर्माण - मॅकिंतोश - एका वर्षापूर्वी सुरू केलं होतं, आणि मी तेव्हाच ३० वर्षांचा झालो होतो. आणि त्यानंतर मला काढून टाकलं. तुम्ही सुरू केलेल्या कंपनी मधुन तुम्हाला कसं काढुन टाकता येईल? खरंतर, जशी एप्पल वाढली तशी आम्ही अश्या एकाला कामावर घेतलं जो, मला वाटलं, माझ्या बरोबर कंपनी चालवण्यासाठी खुप हुशार होता, आणि साधारण पहिल्या वर्षासाठी सर्व गोष्टी ठीक झाल्या. पण मग आमची भविष्याबाबतची द्रुष्टि वेगळी होऊ लागली आणि शेवटी आमच्यात वितुष्ट आले. आणि असं जेव्हा झालं, तेव्हा आमच्या संचालक मंडळाने त्याची बाजू घेलती. अश्याप्रकारे ३० व्या वर्षी मी कंपनीच्या बाहेर होतो. आणि खुपच सार्वजनिक रित्या बाहेर होतो. माझ्या संपुर्ण प्रौढ जिवनाचे जे लक्ष्य होते ते गेले होते, आणि हे सर्व विनाशक होते.
 काय करावे हे पुढचे काही महिने मला खरंच माहित नव्हते. मला असं वाटलं की मी आधिच्या पिढीच्या उद्योजकांना निराश केले होते - कारण मी माझ्याकडे सुपुर्त केलेली छडी टाकली होती. मी डेव्हिड पॅकार्ड आणि बॉब नॉईस ना भेटलो आणि अश्या मोठ्या प्रकारे अपयशी ठरल्याबद्दल माफी मागितली. मी एक खुपच सार्वजनिक अपयश होतो, आणि मी तर वॅली मधून पळून जाण्याचाही विचार केला. पण काही गोष्टी हळुहळू मला लक्षात येऊ लागल्या - मला अजुनही मी जे काम केले त्याबद्दल आत्मियता होती. एप्पल मधे झालेल्या घटनांनी ती एक गोष्ट बदललेली नव्हती. मला धुडकावून लावलं होतं, पण मला अजुनही त्याबद्दल आत्मियता होती. आणि म्हणून मी परत सुरुवात करायची ठरवली.
 मला त्यावेळी ते दिसलं नाही, पण असं होतं की एप्पल मधून काढलं जाणं ही माझ्या जिवनात घडलेली एक सर्वात चांगली गोष्ट होती. नवखेपणातील हलकेपणाने यशस्वी होण्याच्या वजनदार पणाची जागा घेतली होती, सर्वच बाबतीत कमी शाश्वती. त्याने मला माझ्या जिवनातील एका सर्वात कल्पक कालावधित प्रवेश करायला मुक्त केलं होतं.
 पुढच्या पाच वर्षांत, मी नेक्स्ट कंपनी चालू केली, अजून एक पिक्सार नावाची कंपनी चालू केली, आणि मी एका वेगळ्याच स्त्रीच्या प्रेमात पडलो. पिक्सार ने जगातील पहिली संगणकीय एनिमेशन चा चित्रपट बनविला, टॉय स्टोरी, आणि ती कंपनी आता जगातील एक सर्वात यशस्वी एनिमेशन गृह आहे. काही उल्लेखनीय घटनांच्या कलाटणी मधे, एप्पल ने नेक्स्ट विकत घेतली, मी एप्पल मधे परत आलो, आणि आम्ही जे तंत्रज्ञान नेक्स्ट साठी विकसित केले होते ते आता एप्पलच्या नवनिर्मितीचा प्रमुख स्थानी आहे. आणि लॉरेन आणि माझे एक सुंदर कुटुंबं आहे.
 मला खात्री आहे की जर मी एप्पल मधून काढला गेलो नसतो तर या पैकी काहिही झाले नसते. ते एक भयानक चवीचे औषध होते, पण मला वाटतं ती रोग्याची गरज होती. कधी कधी जीवन तुमच्या डोक्यावर एखाद्या विटेने आघात करतं. विश्वास सोडू नका.हे नक्की की, जे मी करत होतो ते मला आवडत होतं आणि केवळ त्यामुळेच मी ते करत राहू शकलो.तुम्हाला जे आवङतं ते नेमकं तुम्ही शोधलं पाहिजे,जसं आपण आपल्याला आवङेल असाच जोङीदार शोधतो तसे आवङेल असेच काम शोधले पाहिजे. तुमचं काम तुमच्या आयुष्याचा एक मोठा हिस्सा असणारे, आणि समाधानी होण्याचा एकमेव मार्ग आहे असं काम करायचं जे तुम्हाला महान वाटतं. आणि महान काम करण्याचा एकमेव मार्ग आहे की तुम्ही जे करताय ते तुम्हाला आवडलं पाहिजे. तुम्हाला जर ते अजून मिळालं नसेल तर शोधत राहा. शांत बसू नका.जसं मनाच्या सगळ्या बाबतीत होतं तसं, जेव्हा तुम्हाला ते मिळेल तुम्हाला ते कळेल.आणि, कुठल्याही सुंदर नात्याप्रमाणे, जशी वर्ष उलटतात तसं तसं ते आणखी सुंदर होत जातं.

तिमिराकडून प्रकाशाकडे..

 
करिअरच्या संघर्षांच्या टप्प्यावर असणाऱ्या अनेकांना दिवाळीचे दिवस आनंदाचे, उत्साह दुणावणारे वाटतातच असे नाही. अशा वेळेस उत्कट जीवनानुभव देणारा हा सण साजरा करण्याच्या प्रथेकडे डोळसपणे पाहिले तर आपली क्षमता आणि आत्मविश्वास जपण्याचे बळ मिळते आणि आपला प्रवास तिमिराकडून प्रकाशाकडे सुरू होतो.
दिवाळीची लगबग सुरू होते. सगळं जग उत्साहात असतं. टीव्हीवर सोनं, कार, मोबाइल इत्यादींच्या जाहिरातींचा मारा सुरू असतो. 'यंदा दिवाळीला काय नवीन?' ची चर्चा घराघरात चालू असते. बाजारपेठा गर्दीनं फुललेल्या असतात. या आनंदानं भरलेल्या वातावरणात काहीजण मात्र अस्वस्थ असतात. त्यांच्या अपेक्षेपेक्षा काहीतरी वेगळं, विपरीत घडलेलं असतं. कष्टांना अपेक्षित फळ नसतं किंवा कष्ट कमी पडलेले असतात.   
'पुढच्या दिवाळीला माझ्या कमाईचा मस्त ड्रेस आणीन तुला,' असा गेल्या दिवाळीत बहिणीला दिलेला शब्द कुणाला आठवत असतो. तेव्हा सगळं नीट चाललं होतं, पण स्पर्धा परीक्षेत यश मिळालं नाही. कुठला जॉब आणि कुठली ओवाळणी? कुणाला नोकरीत अचानक ब्रेक मिळालेला असतो, त्यामुळे यंदा पाडवा नेहमीसारखा होणार नाही, याचं वाईट वाटत असतं. एखाद्या छोटय़ा उद्योजकानं क्लाएंटला वेळेवर डिलिव्हरी देऊनही ऐनवेळी 'सॉरी, अडचण आहे एवढा महिना' असं म्हणत क्लाएंटने पार्ट पेमेंट केलेलं असतं. आता स्वत:ची खरेदी दूरच, उलट कर्मचाऱ्यांच्या वेतनाची चिंता असते. खूप हरल्यासारखं वाटत असतं. कशातच भाग घेऊ नये, काहीच करू नये, दूर पळून जावं अशी भावना असते. आतून कुठलीच प्रेरणा, उभारी येत नाही. दिवाळीच्या दिव्यांकडे पाहून पुन:पुन्हा चिडचिड होत असते.
कशाचा तरी प्रचंड राग येत असतो. कधी स्वत:चा, तर कधी अडचणीत आणणाऱ्यांचा. 'आपण कमी पडतो आहोत' या पराभूत भावनेतून आलेला असहाय संताप काढायला दिव्यांचंही निमित्त पुरतं. अशा वेळी हवा असतो खांद्यावर एका मत्रीच्या स्पर्शाचा आधार. 'मला समजतेय तुझी तगमग,' असं सांगणारी एक समंजस नजर. अशा व्यक्ती आजूबाजूला असतातही, पण आपला इगो (स्वाभिमान) आड येतो. हळवेपण लपवण्यासाठी आपण रागाचा आधार घेतो. 'माझं दु:ख कुणालाच समजणार नाही,' असं ठरवून सगळ्याकडे पाठ फिरवतो. 'आपल्याला किती निर्थक वाटतंय' याचं स्वत:पाशीच उदासपणे किंवा रागाने घोळवत राहतो. मग काही करायची प्रेरणाच उरत नाही.
स्वत:ला असं विझलेपण येतं तेव्हा किंवा उदासपणाच्या अंधारात बुडालेले लोक दिसतात तेव्हा आठवण येते, 'प्रेरणा' या विषयावरच्या एका मुक्त चच्रेची.   
'अतिशय अवघड परिस्थिती असूनही तुम्ही आजपर्यंत जिथे काहीतरी खूप चांगलं केलंत ते कशामुळे केलं? त्यामागची प्रेरणा कुठली होती?' असा प्रश्न एका चच्रेला घेतला होता. अनेक उत्तरं आली, 'माझ्या आवडीचं काम होतं, त्यानेच प्रेरणा दिली' 'कामात १०० टक्के द्यायचे, असं माझ्या आई/ वडील / गुरू / कुणीतरी सांगितलं होतं, ते मी मनापासून पाळलं', 'माझ्या पत्नीने, मुलाने, कुटुंबाच्या विचाराने प्रेरणा दिली', 'मी कुठलंही काम तसंच करते' अशी विविध उत्तरं आली. एकजण म्हणाला, 'व्यवसायाच्या एका अवघड टप्प्यावर होतो. काहीच करू नये अशी हतबलता आली होती. आत्मविश्वास पार संपला होता. अशा वेळी 'आता तू यातून उठत नाहीस, संपलास!' असे एका सहव्यावसायिकाने आव्हान दिले. मला संताप आला. 'आता कसं जमत नाही तेच बघतो' या जिद्दीनं पेटलो. प्रत्येक समस्येला भिडलो, सामोरा गेलो, कामात पूर्ण जीव घातला आणि जिंकलो.' 
'कुणाशी जिंकलास?'
'त्याच्याशी. आव्हान देणाऱ्याशी.' तो म्हणाला. तसे संवादक (फॅसिलिटेटर) हसले.
'तू स्वत:शी जिंकलास मित्रा. तुझ्या हतबलतेशी जिंकलास. अक्षमतांशी, आळसाशी, मनातल्या सबबींशी जिंकलास. तो आव्हान देणारा सहव्यावसायिक फक्त निमित्त होता, ज्यानं तुला शंभर टक्के द्यायला लावलं. येईल त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तो तुझी प्रेरणा झाला त्या वेळी.' थोडं थांबून संवादकांनी विचारलं, 'तू जेव्हा जेव्हा अपेक्षेपेक्षा काहीतरी खूप चांगलं करतोस तेव्हा तेव्हा असंच काहीतरी घडलेलं असतं का?'
'..हो. बहुधा..' तो आठवत आठवत म्हणाला.
'म्हणजे कुणी आव्हान केलं नाही तर तुझ्या हातून काही विशेष घडणारच नाही? कठीण परिस्थितीबद्दल तक्रार करत चिडचिडत राहशील? वेगळ्या मार्गाचा विचारच करणार नाहीस?'
संवादकानं टाकलेला गुगली लक्षात येऊन तो विचारात पडला.
'खुन्नस घेण्यानं शक्ती येते, हे खरं. प्रेरणा येण्यासाठी कधीतरी खुन्नसची मदत घ्यावीही लागते. पण दर वेळी खुन्नसनं काम करावं लागणं ही काही फारशी चांगली सवय नाही. एकदा आपली क्षमता आपल्याला समजली, काम करण्याची इच्छा प्रामाणिक आहे, तर मग प्रेरणा कुठूनही घेता यायला हवी. कोणीतरी आव्हान देईल, याची दर वेळी वाट बघत थोडेच बसणार? मग तुम्ही फक्त कुणाला तरी दाखवण्यासाठीच काम करता, स्वत:साठी करत नाही. तुमच्यातल्या क्षमतेचे नियंत्रण तुम्हाला उचकवणाऱ्या कुणाच्या तरी हातात आहे, असाच त्याचा अर्थ 
होतो ना?'
संवादकांच्या प्रश्नावर गटातले सगळे विचारात पडले. कधी ना कधी, कुठे ना कुठे प्रत्येकानं हा अनुभव घेतलेला होता.  
'असं सणकीसरशी काही करणं तात्पुरतं असतं. तेवढा वेळ ती ऊर्जा जिद्दीनं टिकवली जाते. पण जोरदार उसळी मारून डोंगर चढल्यानंतर पुढे दरीच असते. असं खाली-वर हेलकावणं फार वेळा होत राहिलं की, पुढे 'तणाव व्यवस्थापना'च्या शिबिराला जाणे किंवा रक्तदाबाच्या गोळ्या घेणे अटळ असते. शांतपणा आपल्या आतूनच मिळवता यायला हवा.'
'परिस्थिती जशी असते, तशीच असते मित्रहो! फरक पडतो तो त्याकडे बघण्याच्या आपल्या अ‍ॅप्रोचमुळे. समोर उभी असणारी प्रत्येक सजीव-निर्जीव वस्तू आपल्याला काहीतरी देऊ शकत असते. अवघड परिस्थितीतही काहीतरी चांगलं असतंच. ते शोधायला शिकल्यानंतर आपल्याला रस्ता सापडत जातो. छाती धडधडायला लागली की, आपण हातपाय गाळून बसतो की 'ऑल इज वेल' म्हणत स्वत:तला विश्वास जागवतो यावर सगळं ठरतं.' 
त्या मुक्त चच्रेनं एक नवी नजर दिली. कुठल्याही गोष्टीत खोलवर जाण्याची शक्ती दिली. आपल्याला जे कमी पडतंय ते भोवतालात शोधायला शिकवलं. आपण उत्साहात आहोत म्हणून समोरच्या पणतीच्या ज्योती तेजाळणार नसतात किंवा उदास आहोत, म्हणून विझणारही नसतात. परिस्थिती तशीच राहणार असते. तरीपण त्या दीपज्योतींकडून काय घ्यायचं आपण?
तर पणतीचं स्नेहल तेवणं. वातीच्या मदतीनं पणती जवळच्या इंधनाचा पर्याप्त वापर करते. तिच्यात सगळं पेट्रोल क्षणभरात खाक करणारा भडका नसतो, तर एक मंद शांतपण असतं आणि म्हणून सातत्य. त्या शांतीतही अग्नी असतोच, ज्यामध्ये दुसरी पणती पेटवण्याची क्षमता असते किंवा काहीही जाळण्याचीदेखील. पण जवळची ऊर्जा नीट वापरणं हा पणतीचा 'बाय डिफॉल्ट' गुणधर्म असतो. म्हणून तेवत्या ज्योतीकडे नुसतं पाहूनही मनाला शांत वाटतं.
ज्योतीच्या प्रतीकाकडे कधीतरी अशा दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर दिवाळी म्हणजे मनाला उजळवणारा, तिमिरातून तेजाची दिशा दाखवणारा, विलक्षण सौंदर्यदृष्टी असलेला, एक परिपूर्ण, स्थिर विचार वाटला. दिवाळीतल्या प्रत्येक दिवसाच्या प्रथेमागे कुणा ना कुणासाठी कृतज्ञता आहे किंवा कुठल्या ना कुठल्या नात्याची जपणूक आणि जोडीला निसर्गासोबतची अनुभूती. दिवाळी अतिशय समग्रतेनं उत्कट जीवनानुभव देते. फक्त त्याकडे तसं पाहायला हवं.
वसुबारसेला सवत्स धेनूची पूजा - आपल्या मुलाबाळांना दूध देणाऱ्या गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच आई-मुलांच्या नात्याचं दृढीकरण. धनत्रयोदशीला एकीकडे धन्वन्तरी जयंती आणि सोबत यम-दीपदानदेखील. नरक चतुर्दशीमागची मुख्य संकल्पना आहे, अनिष्ट प्रवृत्तींचा नाश. पण अभ्यंगस्नानाची प्रथा आणखीही बरंच काही देते. ऐन थंडीत भल्या पहाटे आई-आजीनं घरातल्या लहान-थोरांना तेल-उटणं लावून देण्यात प्रत्येक वयाच्या स्पर्शाच्या गरजेचा विचार आहे. अनुभवलीच पाहिजे अशी आश्विनातली सुखदायी थंडी. त्या थंडीत पाठीवरून, अंगावरून फिरणारा तो मायेचा स्पर्श ऊब देतो, नि:शब्दपणे आधार देतो. तसंच नातं बळकट करतो पती-पत्नीच्या नात्याचा सन्मान करणारा पाडवा आणि भाऊ-बहिणींची भाऊबीज.
सण आणि प्रथांमध्येच हे बांधून टाकल्यामुळे प्रत्येक घराला आणि प्रत्येक व्यक्तीला हे भाग्य निश्चितपणे मिळणारच. या सर्वाच्या सोबतीला सतत पाश्र्वभूमीवर आहे पणतीची ज्योत. नव्हे, दीपांची आवली. त्यामुळे नात्यांमधली समग्रताही पणतीच्या प्रतीकासोबत आपोआप जोडली गेली आहे.
दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनासोबतही असंच बरंच जोडलेलं. धनलक्ष्मीच्या पूजेआधी 'लक्ष्मी' म्हणून नव्या केरसुणीची पूजा करण्यामागे स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित केलंय. लक्ष्मीपूजनाला आश्विनातल्या अमावास्येचा मुहूर्त शोधून पूर्वसुरींनी अमावास्येला शुभदायी तर केलंच वर त्या रात्रीच्या सौंदर्याचा विशेष सन्मान केलाय. दिवाळी म्हणजे निसर्ग आणि मानवाच्या परस्परपूरकतेचा एक परिपूर्ण अनुभव वाटतो.
दिवाळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तशी या समग्र, सर्वसमावेशक विचारातली परिपूर्णता टप्प्याटप्प्यानं जाणवत गेली. आता 'दिवाळी' या शब्दासोबत एक चित्र (व्हिज्युअल) माझ्या डोळ्यांसमोर उभं राहतं.   
अमावास्येच्या रात्री एक एकांडा प्रवासी पाठीवर बरंच ओझं घेऊन अंधारातून चालला आहे. अंधारात चेहरा स्पष्ट दिसत नाही, पण कल्पनाचित्रात सहसा ते आपणच असतो. तो प्रवासानं थकला आहे. त्याच्या मनात एक अस्वस्थता आहे. 'कधी संपेल हा थकवणारा प्रवास? की संपणारच नाही? कधी पोहोचेन मुक्कामाला? मुक्कामाच्या गावातले लोक कसे असतील?' अशी साशंकताही त्याला मधूनमधून छळते आहे. वातावरणात थोडी बोचरी, पण सुखद थंडी आहे. त्या अंधारात प्रवाशाला दूरवर दिव्यांच्या ठिपक्यांची ओळ दिसते. अपरात्री अचानक मुक्काम दिसल्यावर तो घाईनं गावापाशी पोहोचतो. वर निरभ्र आकाशात चंद्र नसताना एकेक तारा आणखी लखलखीत चमकत असतो आणि खाली प्रत्येक दारात असतात उजळत्या दीपमाला. घराघरांच्या कोनाडय़ांत लावलेल्या मंद दिव्यांच्या ज्योती त्याचं नि:शब्दपणे स्वागत करत असतात. त्या ज्योतींकडे पाहून त्याला अतिशय शांत वाटतं. त्याच्या मनात त्या गावाबद्दलच एक विश्वास जागतो. ते अनोळखी गाव त्याला एकदम आपलं वाटतं. दिव्याच्या ज्योतींकडून आकाशातल्या ज्योतींकडे पाहताना त्याचे हात आपोआप जोडले जातात आणि त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडतात, दीपज्योती नमोस्तुते!